हैदराबाद, उन्नावमधील अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका

माउंट अबू, राजस्थान : महिलांवरच्या राक्षसी हल्ल्यांमुळे देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे त्यामुळे ज्यांना पॉक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले आहे त्यांचा दयेच्या अर्जाचा (याचिकेचा) अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी जळजळीत भाष्य करताना ठोस  संदेश दिला.

अशा आरोपींचा दयेच्या अर्जाचा अधिकार नाकारायचा की नाही याचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. पण आमचा सर्वाचा विचार आता त्या दिशेने आहे, असे त्यांनी माउंट अबू येथे महिला सुरक्षेवर आयोजित कार्यक्रमात सांगितले.

कोविंद म्हणाले की, महिलांची सुरक्षा हा अतिशय गंभीर विषय बनला आहे. यात बरेच काम झाले आहे व अजून बरेच बाकी आहे. आमच्या कन्यांवर होणारे राक्षसी हल्ले पाहून देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे. त्यामुळे आईवडील, नागरिक, तुम्ही आम्ही सर्व जणांनी पुरुषांमध्ये महिलांविषयी आदराची भावना रूजवण्याची गरज आहे. या निमित्ताने अनेक मुद्दे पुढे येत आहेत. अशा आरोपींना घटनेने दयेच्या अर्जाचा अधिकार दिलेला आहे. पण बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे पॉक्सो अंतर्गत दोषी ठरवलेल्या गुन्हेगारांना दयेचा अधिकार नाकारण्यात यावा, त्यांना असा अधिकार असू नये असे माझे मत आहे.

हैदराबाद येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकण्यात आल्याची घटना, त्यानंतर गुरुवारी उन्नाव येथे एका महिलेला ती बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात असताना जाळून मारल्याची घटना, या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलाला शिक्षण दिले तर एका कुटुंबाला फायदा होतो पण मुलीला शिक्षण दिले तर दोन कुटुंबांना फायदा होतो. शिवाय शिक्षित महिलांची मुले अशिक्षित राहण्याची शक्यता कमी असते. महिलांचे आर्थिक सक्षमीकरणही महत्त्वाचे असून जन धन योजनेने त्यात मोठी भूमिका पार पाडली आहे, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

उन्नाव प्रकरणात ‘एसआयटी’ची स्थापना

लखनऊ : उन्नाव बलात्कार पीडितेला गुरुवारी पाच जणांनी जिवंत जाळल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी लखनऊच्या विभागीय आयुक्तांनी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. उन्नावमधील घटनास्थळाला गुरुवारी आपण भेट दिली आणि उन्नावचे पोलीस अधीक्षक विनोद पांडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. हे पथक या घटनेचा सर्वंकष तपास करून आपल्याला अहवाल सदर करणार असल्याचे विभागीय आयुक्त मुकेश मेश्राम यांनी सांगितले.