काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीमधून एक हिपहॉप रॅपर अचानक गायब झाल्यामुळे खळबळ उडाली होती. कारण या रॅपरनं गायब होण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका पोस्टमुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय बळावला होता. याच कारणामुळे त्याच्या आईने दिल्ली पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. काही वर्षांपूर्वी या रॅपरनं गायलेल्या एका गाण्यावरून देखील सुरू असलेल्या वादाची याला पार्श्वभूमी होती. पण पोलिसांना असलेला अपहरणाचा किंवा आत्महत्येचा संशय खोटा ठरला आणि हा रॅपर सापडला मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये!

‘त्या’ गाण्यावरून येत होत्या धमक्या!

दिल्लीच्या हिप-हॉप गायकांच्या वर्तुळात सर्वपरिचित नाव असलेला MC Kode उर्फ आदित्य तिवारी हा २२ वर्षांचा रॅप गायक २ जूनपासून गायब झाला होता. ५ वर्षांपूर्वी आदित्य तिवारीनं एका रॅप बॅटलमध्ये (रॅप गाण्यांची स्पर्धा) गायलेल्या एका गाण्यावरून त्याला धमक्या येऊ लागल्या होत्या. या गाण्यामध्ये त्याने अनावधानाने हिंदू धर्मग्रंथांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा दावा करण्यात आला होता. या गाण्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी पुन्हा व्हायरल झाला. त्यावरून त्याला धमक्या येऊ लागल्या. तो ट्रोल होऊ लागला.

कानाखाली लगावणाऱ्यास ५० हजारांचा इनाम!

दरम्यान, आपली चूक लक्षात आल्यानंतर आदित्यनं त्यासाठी जाहीर माफी देखील मागितली होती. मात्र, तरीदेखील ट्रोलिंग आणि धमक्या सुरूच होत्या. एका व्यक्तीने तर आदित्य तिवारीला २० वेळा कानशिलात लगावणाऱ्याला ५० हजार रुपयांचा इनाम देखील जाहीर केला होता.

आदित्यची ‘ती’ पोस्ट व्हायरल!

दरम्यान, हे ट्रोलिंग आणि धमक्या सुरू झाल्यानंतर आदित्य तिवारीनं एक इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. “सातत्याने सुरू असलेला त्रास, आयुष्यातील धक्के आणि ट्रायल्समुळे मी कमकुवत झालो आहे. आत्ता मी यमुना नदीवरच्या एका निर्जन स्थळी आहे. या सर्व घडामोडींसाठी मी माझ्याशिवाय इतर कुणालाही दोष देत नाही. स्वत:च्या अस्तित्वातून सुटका मिळणंच आख्ख्या देशाला अपेक्षित असलेली शिक्षा देऊ शकेल”, अशा आशयाची पोस्ट त्यानं इन्स्टाग्रामवर केली होती.

आदित्यची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याला शोधण्यासाठी अेकांनी प्रयत्न सुरू केले. त्याच्या मित्रमंडळींनी आणि इतर नातेवाईकांनी सोशल मीडियासोबतच इतरही ठिकाणी आदित्यला शोधण्याचं आवाहन केलं. प्रसिद्ध रॅप गायक रफ्तार आणि डिवाईन यांनी देखील आदित्यला शोधण्यासाठी पोस्ट केल्या होत्या.

पोलिसांत तक्रार दाखल!

आदित्य तिवारीची पोस्ट आणि त्याला येणाऱ्या धमक्या या पार्श्वभूमीवर त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली आणि त्याचा शोध सुरू केला. त्याची आई दीपा तिवारी यांनी दक्षिण दिल्लीच्या मैहरौली पोलीस स्थानकात ४ जून रोजी तक्रार दाखल केली होती. दुसऱ्याच दिवशी आदित्यच्या अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

ट्रोल झाल्यानंतर रॅपर आदित्य तिवारी बेपत्ता, सोशल मीडिया पोस्टमुळे चाहते चिंताग्रस्त

…आणि आदित्य सापडला!

पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर आदित्यच्या फोनचं शेवटचं लोकेशन नोएडा सापडलं. ते होतं २५ मे रोजीचं. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला होता. पोलिसांनी सोशल मीडिया कंपन्यांशी संपर्क करून आदित्यच्या खात्याची माहिती देखील मिळवली. त्या माहितीच्या आधारे आदित्यचा ठावठिकाणा थेट मध्य प्रदेशच्या जबलपूरपर्यंत गेला. पोलिसांनी तातडीने एक पथक जबलपूरला पाठवलं. तिथे आदित्य त्याच्या एका मित्राकडे असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि शोधमोहिमेला पूर्णविराम लागला!

आदित्यनं ‘ती’ पोस्ट का टाकली होती?

दरम्यान, पोलिसांनी अजूनही त्याची चौकशी केली नसून तो जबलपूरला का गेला होता? इन्स्टाग्रामवरची ती पोस्ट त्यानं का आणि कुठून टाकली होती? मधल्या पूर्ण वेळेत तो जबलपूरलाच होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.