साधारण १ हजार कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका दीíघकेत वैज्ञानिकांना अगदी सममिताकार आइनस्टाइन रिंग्ज (कडी) सापडली आहेत. जास्त वस्तुमानाच्या दीर्घिकेमागे लपलेल्या दीर्घिकेमुळे हा परिणाम दिसतो. आइनस्टाइनच्या कडय़ांचे भाकीत हे साधारण सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताआधारे करण्यात आले होते. त्या दुर्मिळ असल्या तरी त्यांच्याबाबत बरीच उत्सुकता होती. कॅनरी बेटांवरील युनिव्हर्सिटी ऑफ ला लागुना व इन्स्टिटय़ूट दा अ‍ॅस्ट्रोफिजिका दा कॅनरीज या संस्थांच्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या या कडय़ांना कॅनरीयन आइनस्टाइन कडी असे नाव देण्यात आले आहे.
आइनस्टाइन कडी हा दूरस्थ दीर्घिकेचा दृश्यविभ्रम असतो, ती दीर्घिका हा त्याचा स्रोत असतो. प्रकाशाचे विवर्तन झाल्याने म्हणजे तो वाकल्याने स्रोतापासूनचे प्रकाशकिरण कडय़ासारखे दिसतात. प्रचंड वस्तुमानाच्या दीर्घिकेमुळे हे प्रकाशकिरण वाकतात. थोडक्यात दूरस्थ दीर्घिकेपासून आलेला प्रकाश वाकल्याने आपल्याला दिसणारी ती त्या दीर्घिकेची विकृत प्रतिमा असते. दीर्घिका भिंगामुळे प्रकाशकिरण वाकतात, त्यामुळे अवकाश व काळ यांची रचना बदललेली वाटते. यामुळे केवळ वस्तुमान असलेल्याच वस्तू आकर्षिल्या जातात असे नाही तर प्रकाशकिरणांचा मार्गही बदलतो. जेव्हा दोन दीर्घिका समांतर असतात तेव्हा दूरच्या दीर्घिकेची प्रतिमा वर्तुळाकार होते. त्यातील विकृतिकरण हे मूळ स्रोत असलेल्या दीर्घिकेतील असममितीशी निगडित असते. मार्गारिटा बेटीनेली यांना आइनस्टाइन कडी शोधण्याचा मान मिळाला आहे. त्यांनी चिलीतील टोलोलो वेधशाळेतील ब्लांको दुर्बिणीच्या डार्क एनर्जी कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. अश्म बटू दीर्घिकेतील ताऱ्यांची संख्या किती असावी याचा शोध घेतला जात असून त्यातून आइनस्टाइन कडय़ांवर आणखी माहिती मिळेल, कॅनरीज येथील दुर्बिणीच्या ठिकाणी असलेल्या ओसिरिस वर्णपंक्तीमापीच्या मदतीने संशोधकांनी या कडय़ांचे भौतिक गुणधर्म शोधण्यास सुरुवात केली आहे. कॅनॅरियाज आइनस्टाइन कडी ही आजपर्यंत शोधली गेलेली सममिताकार कडी आहेत. यात दोन दीर्घिका एकमेकांशी बऱ्यापैकी जुळत असतात. केवळ ०.२ आर्कसेकंद इतका फरक त्यांच्यात असतो. यात स्रोत दीर्घिका १००० कोटी प्रकाशवर्षे दूर असून विश्वाच्या प्रसरणामुळे त्यापासून निघणाऱ्या प्रकाशाला कापावे लागणारे अंतर कमी होते व ते ८५० कोटी प्रकाशवर्षे होते. जेव्हा निळी दीर्घिका उत्क्रांत होत असते व अनेक तरुण तारे निर्माण होत असतात तेव्हा निरीक्षण यात फायद्याचे ठरते. यातील दुसरी भिंग दीर्घिका (लेन्स गॅलेक्सी) ही ६०० कोटी प्रकाशवर्षे दूर आहे व ती जास्त उत्क्रांत आहे. तेथील ताऱ्यांची निर्मिती थांबली आहे. यातून आपल्याला स्रोत असलेल्या मूळ दीर्घिकेची रचना व इतर माहिती समजते. गुरुत्वीय क्षेत्र व भिंग दीर्घिकेतील कृष्णद्रव्याची माहिती कळते. असे अँटानियो अपारिसियो यांनी सांगितले. मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.