पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीतील विरोधी पक्षाचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांच्या नावावरुन केलेली शेरेबाजी राज्यसभेच्या कामकाजातून वगळण्यात आली. विरोधकांनी या शेरेबाजावीर आक्षेप घेतला होता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही शेरेबाजी कामकाजातून वगळली असून संसदेच्या इतिहासात पंतप्रधानांचे वक्तव्य कामकाजातून वगळले जाण्याची घटना दुर्मिळच आहेत.

गुरुवारी राज्यसभेतील उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांच्या नावावरुन शेरेबाजी केली होती. यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला होता. शेवटी सभापती व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधानांच्या विधानांमध्ये काही आक्षेपार्ह आहे का, याची पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. पाहणीत पंतप्रधानांनी केलेले विधान असंसदीय ठरत असल्याचे समोर आले.

अखेर शुक्रवारी सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही शेरेबाजी कामकाजातून वगळल्याचे स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते बी के हरिप्रसाद म्हणाले, पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने आपल्या पदाचा आब कमी केला. दरम्यान, शुक्रवारी सभापतींनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली काही विधानेही कामकाजातून वगळली.