07 March 2021

News Flash

नितीश कुमारांच्या शपथविधीस तेजस्वी यादव जाणार नाहीत

महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आल्याचा तेजस्वी यादव यांनी आरोप केलेला आहे.

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी काल निवड करण्यात आली. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झालं. आज (सोमवारी) दुपारी ४.३० वाजता पाटणा येथे नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. तर, नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.

निवडणूक निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत असा आरोप केला होता. महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला होता. तर, जनमताचा कौल हा आमच्या बाजूनेच होता. मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता असं देखील तेजस्वी यादव म्हणाले होते.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी १२५ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे. तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली कडवी झुंज देणारा राष्ट्रीय जनता दल (राजद) ७५ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ ७४ जागा मिळवून भाजपाने दुसरे स्थान मिळवले आहे.

तर, अवघ्या ४० जागा मिळालेल्या असताना त्या जोरावर नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री कसे काय होऊ शकतात? असा प्रश्न राजदचे नेते मनोजकुमार झा यांनी विचारला आहे.लोकांनी दिलेला कौल हा नितीशकुमार यांच्या विरोधात आहे. त्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बिहारची जनता लवकरच दुसरा पर्याय शोधू शकते. कदाचित आठवडाभरात, कदाचित दहा दिवसात किंवा कदाचित महिनाभरात बदल घडेल असंही झा यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 11:59 am

Web Title: rashtriya janata dal leader tejashwi yadav will not attend the oath taking ceremony of bihar cm designate nitish kumar msr 87
Next Stories
1 बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत तारकिशोर प्रसाद यांनी केलं महत्वाचं विधान
2 ‘इमरती देवी जिलबी बनल्या’, काँग्रेस नेत्याने साधला निशाणा
3 देशभरात २४ तासांत ४३ हजार ८५१ जण करोनामुक्त
Just Now!
X