बिहारमध्ये सध्या पुराने थैमान घातले आहे. सीतामढी, मुजफ्फरपुर, पूर्व चंपारण, अररिया, सुपौल, किशनगंज आणि शिवहर या जिल्ह्यांना पूराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्य देखील सुरू आहे. मात्र या सर्व परिस्थितीनंतरही राज्य सरकार निष्क्रियता दाखवत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय जनात दलच्या नेत्या राबडी देवी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज बिहार विधानसभेच्या सरकारच्या विरोधात निदर्शनं केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या २६ पथकांनी पूरग्रस्त भागांमधून जवळपास १ लाख २५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.