सुषमा स्वराज यांची अकाली एक्झिट चटका लावणारी आहे. एका तेजस्वी व्यक्तिमत्वाचा अशा प्रकारे अंत होणं अविश्वसनीय आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे. ४ दशकांपेक्षा जास्त काळ असलेली त्यांची राजकीय कारकीर्द आदर्श मानावा अशीच होती. एक आदर्श नेत्या, सक्षम आणि प्रभावी मंत्री, समर्पणाची भावना असलेल्या सुषमा स्वराज या आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही असंही या पत्रकात म्हटलं आहे.

सरकारने काश्मीरबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यानंतर बातमी आली ती त्यांच्या निधनाचीच. देशात परिवर्तनाला सुरुवात झाली आहे आणि अशा काळात त्यांनी हे जग सोडून जाणं असह्य करणारं आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आम्ही कायम आहोत. देव त्यांच्या कुटुंबीयांना आभाळाएवढं दुःख सहन करण्याची शक्ती देओ अशीही प्रार्थना आम्ही करतो आहोत असेही संघाने म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे त्यांचे निधन झाले. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल आणि कन्या बांसुरी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.