नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर, विरोधात १०५ मते पडली. विधेयकावरून घूमजाव करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी स्वागत केले आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणण्यासाठी उचलेल्या धाडसी पावलाबाबत आम्ही केंद्र सरकार, पंतप्रधान व गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानू इच्छितो. भारतात राहणाऱ्या निर्वासितांना (अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील) सन्मानाचे स्थान देणे हा सध्याच्या सरकारचा मोठा उपक्रम आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो. असे भय्याजी जोशी यांनी म्हटले आहे.

अनुच्छेद ३७० नंतर एक महत्त्वाचा निर्णय म्हणून या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाकडे पाहिलं जात होतं. आता या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. भाजपाचा हा एक महत्त्वाचा संकल्प होता जो पूर्ण झाला असल्याचे बोललं जात आहे. या विधेयकावरुन जी चर्चा राज्यसभेत झाली त्यानंतर विरोधकांनी १४ सूचना मांडल्या होत्या. या सूचनांबाबतही मतदान घेण्यात आलं. मतदान घेऊन १४ पैकी बहुतांश सूचना फेटाळण्यात आल्या.

या निर्णयावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ” आज भारतीय संविधानाच्या इतिहासातील काळा दिवस पाहण्यास मिळाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मिळालेली मंजुरी म्हणजे कोत्या मनोवृत्तीच्या आणि धर्मांध शक्तीच्या लोकांचा विजय आहे” अशी खरमरीत टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.