टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मुंबईतील अर्जुन देशपांडे या १८ वर्षीय मराठमोळ्या तरूणाच्या फार्मसीमध्ये ५० टक्क्यांची भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी अर्जुननं आपल्या ‘जनरिक आधार’ नावाच्या फार्मसीची सुरूवात केली होती. ही कंपनी औषधांच्या किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात औषधांचा पुरवठा करते.

किती रकमेत टाटांसोबत हा व्यवहार झाला याची मात्र माहिती देण्यात आली नाही. अर्जुन देशपांडे यांनं आपल्या आई-वडिलांकडून आर्थिक मदत घेत दोन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता. अर्जुन देशपांडे यानंदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु त्यानं याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या व्यवहारावर चर्चा सुरू होती. रतन टाटा यांना या व्यवसायात रस होता. तसंच व्यवसाय चालवण्यासाठी त्यांना अर्जुनचं मेंटोरही बनायचं होतं म्हणून त्यांनी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिझनेस टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “रतन टाटा यांनी जनरिक आधारमध्ये ५० टक्क्यांची भागीदारी केली आहे. तसंच याची औपचारिक घोषणा लवकरच केली जाणार आहे,” असं अर्जुननं सांगितलं. यापूर्वी रतन टाटा यांनी पेटीएम, स्नॅपडील, क्योरफिट, अरबन लॅडर, लेन्सकार्ट आणि लायबरेट या स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली होती.

अर्जुन देशपांडे यानं दोन वर्षांपूर्वी जनरिक आधारची सुरूवात केली होती. सध्या या कंपनीचं वार्षिक ६ कोटी रूपयांचा व्यवसाय आहे. ही कंपनी एक युनिक फार्मसी अॅग्रिगेटर बिझनेस मॉडेलाचा वापर करते. थेट औषध उत्पादकांकडून औषधं खरेदी करून ती औषधांच्या किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे होलसेलरचं तब्बल १६ ते २० टक्क्यांच्या मार्जिनची बचत होते.

कंपनीचा होणार विस्तार

मुंबई, पुणे, बंगळुरु आणि ओदिशातील ३० रिटेलर या कंपनीशी जोडले गेले आहेत. जनरिक आधारमध्ये सध्या ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये फार्मासिस्ट, आयटी इंजिनिअर आणि मार्केटिंगमधील तज्ज्ञ मंडळी आहेत. येत्या वर्षभरात १ हजार फ्रेन्चायझी स्टोअर उघडण्याचा मानस असल्याचं अर्जुननं सांगितलं. तसंच महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीपर्यंत याचा विस्तार करणार असल्याचं त्यांनं नमूद केलं.