एका विवाहित महिलेने रेशन दुकानदारावर बलात्काराचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात शामलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सरकारी आदेशानुसार मोफत रेशन देण्याचे या वितरकाने महिलेला आश्वासन दिले होते. मिड डे ने हे वृत्त दिले आहे. सरकारी नियमानुसार कुटुंबांसाठी धान्याचा एक कोटा ठरलेला असतो. ते धान्य मिळवण्यासाठी महिलेने धान्य वितरकाशी संपर्क साधला होता. या महिलेता पती पंजाबमध्ये अडकला आहे. घरात पैशांची चणचण निर्माण झाल्याने कोटयातील मोफत धान्य घेण्यासाठी ती रेशन दुकानात गेली होती.

बराच वेळ धान्य घेण्यासाठी म्हणून ती रेशन दुकानात थांबली. पण रेशन दुकानदाराने तिला धान्य दिले नाही. तिला तिथून निघून जायला सांगितले. “मंगळवारी संध्याकाळी आरोपी माझ्या घरी आला. रेशन देण्याऐवजी त्याने माझ्यावर बलात्कार केला” असा आरोप महिलेने केला आहे.

“पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे” अशी माहिती शामलीचे पोलीस अधीक्षक विनित जैस्वाल यांनी दिली.

ही महिला भाडयाच्या घरात राहते. या महिलेच्या घरमालकाने सांगितले की, “पीडित महिलेचा पती दुसऱ्या राज्यात अडकला आहे. तिच्याकडे आता पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे गेल्या तीन आठवडयांपासून आम्ही तिला जेवण देत होतो. पण आमची परिस्थिती खराब झाल्यानंतर आम्ही तिला जेवण देणे बंद केले.” पीडित महिलेचा पती मजूर आहे. तो त्याच्या कामाचा पगार घेण्यासाठी पंजाबला गेला होता. पण देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे तो तिथेच अडकला.