जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० फायदेशीर ठरले आहे की नाही यावर जनतेचे मत घ्यावे, अशी सूचना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली होती. याबाबत संघ परिवाराच्या भूमिकेपेक्षा त्यांनी वेगळी भूमिका मांडली. यावर चर्चेला तोंड फुटल्यावर मोदींनी कलम ३७० बरोबरच काश्मिरी पंडितांच्या वेदनांबाबत चर्चा व्हावी असा आग्रह धरला आहे.
केवळ ३७० वे कलमच नाही तर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वच प्रश्नांबाबत व्यापक चर्चा व्हावी असे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे. हा मुद्दा आपण उपस्थित केल्यावर प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाल्याचे सांगत त्याचे श्रेय घेतले. रविवारी जम्मू येथील सभेत मोदींनी महिलांबाबत होत असलेल्या भेदभावाचा मुद्दा ओमर अब्दुल्लांचे उदाहरण देत सांगितल्यावर. अब्दुलांच्या पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मोदींना अपुरी माहिती असल्याचा आरोप केला जात आहे.
आपण जेव्हा जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांच्या वेदनांची चर्चा करतो तेव्हा, या समस्यांमधून लोकांना जोडण्याची भूमिका असल्याचे मोदींनी सांगितले. काश्मिरी पंडितांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. त्यांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मोदींनी सांगितले. अरुण जेटली यांनी जम्मू आणि काश्मीरमधील भेदभावाचा मुद्दा केला. अशा पद्धतीच्या वर्तनाला कायद्यात स्थान नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता, एकात्मता आणि विविधतेसाठी प्रयत्न करायला हवेत असे मोदींनी सुचवले आहे.