स्थानकाजवळील खोलीत ठेवण्यात आलेल्या दारुच्या कॅन्सपैकी अनेक कॅन्स गायब आहेत तर बाकी कॅन रिकामे सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस अधिक्षक अभिनंदन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दारु उंदरांनी प्यायली आहे का या संदर्भातील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात जप्त केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही लवकरच या सर्व उंदरांना पकडू असेही सिंग म्हणाले आहेत.

पोलिसांनी नक्की किती लिटर दारु गायब झाली आहे याबद्दलची माहिती नसली तरी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सुत्रांनी एक हजार लीटर दारु पोलीस स्थानकाच्या आवारातून गायब झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी वेळोवेळी ठिकठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये बेकायदेशीपणे साठवण्यात आलेली ही दारु जप्त करण्यात आली होती.

छावणी पोलीस स्थानकातील एक हवलदार अडगळीच्या खोलीमध्ये काही कामानिमित्त गेला असता तेथे तो रिकाम्या कॅन्सवरुन घसरून पडल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. नुकीतच या पोलीस स्थानकात बदली झालेले मुख्य हवलदार महेश पाल हे अडगळीच्या खोलीमध्ये काही कामानिमित्त गेले असता त्यांना तेथे रिकामे कॅन्स दिसून आले. तसेच या कॅन्सच्या बाजूला उंदीर फिरतानाही त्यांनी पाहिल्याची माहिती सिंग यांनी दिली.

सामान्यपणे एखाद्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या दारुचे नमुणे चाचणीसाठी घेतले जातात. त्यानंतर ती दारु नष्ट केली जाते. त्या खोलीत असणारी दारु काही मागील दशकभरात झालेल्या कारवायांमध्ये ताब्यात घेण्यात आली होती. मात्र ही दारु नष्ट का करण्यात आली नाही याबद्दल मला कोणीतीही कल्पना नाही. यासंदर्भात आपण वरिष्ठांना पत्र लिहीले असल्याचेही सिंग म्हणाले. सध्या या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु आहे.