मध्य प्रदेशमधील इंदूर शहरातील एका सरकारी रुग्णालयामध्ये उंदराने बाळाच्या पाय कुरतडल्याची घटना समोर आली आहे. या बाळाची टाच आणि अंगठा उंदारने कुतरडल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक समिती स्थापन केलीय. महाराजा यशवंतराव चिकित्सालय (एमव्हायएचचे) अधीक्षक प्रमेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या रुग्णालयामध्ये लहान मुलांची देखभाल करण्यासाठी जो कक्ष आहे तिथे एका बाळाचा पाय उंदाराने कुरतडल्याचा प्रकार समोर आलाय. १९ दिवसांच्या बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुरतडला असून या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आलेत.”

ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन सदस्य असणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आलीय. यामध्ये रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे. एमव्हायएचच्या अधीक्षकांनी ज्या बाळासोबत हा प्रकार घडला त्याची माहिती दिलेली नाही. तसेच बाळा झालेल्या जखमा किती गंभीर आहेत यासंदर्भातील माहिती ही देण्यात आलेली नसल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाळाचा जन्म नियोजित वेळेआधीच झालेला, म्हणजेच बाळ हे प्री मॅच्यूअर बेबी आहे. बाळाचं वजन १.४ किलो इतकं आहे. या बाळाला देखरेखीसाठी वॉर्मर म्हणजेच उष्ण काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेलं. सकाळी बाळाची आई प्रियंका दूध पाजण्यासाठी गेली असता तिला धक्काच बसला. बाळाच्या पायांना जखमा असल्याचं तिला दिसलं. त्यानंतर तेथे तैनात असणाऱ्या आरएसओला अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं. प्लॅस्टिक सर्जनने बाळाची तपासणी केली. त्यावेळी बाळाचा पाय उंदाराने कुतरडल्याचं स्पष्ट झालं. या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर असून सहा वर्षांपूर्वी या रुग्णालयामध्ये आम्ही दहा हजार उंदीर मारल्याचा दावा एका खासगी कंपनीने केलाय.

काही दिवसांपूर्वीच याच रुग्णालयामधील वॉर्मरमध्ये ठेवण्यात आलेल्या बाळाच्या पायाला चटका बसल्याची घटना घडील होती. नर्सने वॉर्मरचं तापमान एवढं वाढवलं की या बाळाच्या पायाला जखमा झाल्या होत्या. बाळाच्या आजी आजोबांनी वेळीच ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्याने बाळाचे प्राण वाचले.