मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या रतुल पुरी यांच्याबाबत सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा खुलासा केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी(आर्थिक गैरव्हवहार) ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात, रतुल पुरीने अमेरिकेतील नाइटक्लबमध्ये एकाच रात्रीत तब्बल 11 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 7.8 कोटी रुपये उडविल्याचं म्हटलं आहे. आरोपपत्रात रतुल पुरीसह त्यांचे सहकारी आणि मोजरबेअर इंडिया कंपनीचे नावही आहे. ‘मोजरबेअर’मध्ये रतुल पुरी कार्यकारी संचालक होते.

अंमलबजावणी संचलनालयाने गुरुवारी दिल्ली न्यायालयात 110 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात, देवाण-घेवाण व्यवहारांच्या चौकशीनंतर भारत आणि विदेशातील अनेक महागड्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी व्यवहार झालेत. अमेरिकेतील प्रोव्होकेटर नावाच्या नाइट क्लबमध्ये एकाच रात्रीत 11 लाख 43 हजार 980 डॉलर (जवळपास 7.8 कोटी रुपये) खर्च करण्यात आल्याचं म्हटलं आहे. नोव्हेंबर 2011 ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत रतुल पुरीने आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी 45 लाख डॉलर खर्च केल्याचंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

आरोपपत्रात रतुल पुरीवर ईडीने आठ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी मोजरबेअर इंडिया कंपन्यांच्या “जटिल रचनेचा” वापर केल्याचा दावाही ईडीने केला आहे. पैसे वळवण्यासाठी “शेल कंपन्या” स्थापन केल्याचंही ईडीने म्हटलंय. पुरी यांच्यावर विविध सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्हवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातही रतुल पुरी आरोपी असून त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 20 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.