काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय? असा सवाल कायदा व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणावर विरोधात निर्णय दिल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झालाच आहे असा दावा केला आहे. त्यावर बोलताना प्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली.


देशाचा चौकीदार चोरच आहे, राफेल विमान घोटाळा झाल्याचे आम्ही सिद्ध करु आणि एक दिवस सत्य बाहेर आणू असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर बोलताना, राहुल यांनी पंतप्रधानांवर टीका करताना ज्या भाषेचा प्रयोग केला आहे, ती भाषा अत्यंत खालच्या दर्जाची असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत असं प्रसाद म्हणाले.

राहुल गांधी यांनी राफेलबाबत केलेल्या विधानांवर पाकिस्तान आणि चीनने त्यांची पाठ थोपाटली आहे. कारण पाकिस्तान आणि चीनला त्यांची वायुसेना बळकट करायची आहे. याशिवाय त्यांना आपल्या ताकदीविषयी जाणून घ्यायचे आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर केला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष सुप्रीम कोर्टापेक्षाही स्वत:ला मोठे समजत आहेत का?, असा सवाल करत राहुल यांचा संवैधानिक संस्थांवर विश्वास राहिलेला नाही असं प्रसाद म्हणाले.