19 January 2021

News Flash

‘प्रसंगी समाजमाध्यमांवरही कारवाई’

‘ब्लू व्हेल’चा केरळात संशयित बळी

| August 17, 2017 02:00 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘ब्लू व्हेल’ हा ऑनलाइन खेळ हटविण्यात आला नाही तर प्रसंगी समाजमाध्यमांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा कायदा आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिला आहे. या खेळातील आव्हान स्वीकारून मुले आत्महत्या करीत असल्याने केंद्र सरकारनेही या खेळावर बंदी घातली आहे.

‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळे लोक आत्महत्या करीत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यानुसार कठोर कारवाई करू, असेही प्रसाद या वेळी म्हणाले.

देशभरातील समाजमाध्यमांना हा खेळ हटविण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. भारतातील तरुण या खेळामुळे आत्महत्या करत असून ही बाब शोकांतिकाच आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने ११ ऑगस्ट रोजी गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मायक्रोसॉफ्ट आणि याहू यांना हा खेळ हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या सर्व समाजमाध्यमांना पुन्हा एकदा गांभीर्याने सूचना देण्यात येत आहे. या सूचनेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही प्रसाद म्हणाले. ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा ५० दिवसांचा ऑनलाइन खेळ असून या खेळातील शेवटचा टप्पा आत्महत्येचा आहे. रवी शंकर प्रसाद यांनी या खेळाबाबत चिंता व्यक्त केली.

ब्लू व्हेलचा केरळात संशयित बळी

केरळमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली असून ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन खेळातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्य़ांतर्गत या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

२२ वर्षीय तरुणाने मागील महिन्यात घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘ब्लू व्हेल’ या खेळाचे व्यसन लागल्यामुळेच त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी असलेल्या या तरुणाने काही दिवसांपूर्वी नैराश्यातून हातावर ब्लेडने जखम केली होती. त्याला अनेकदा समुपदेशनही करण्यात आले. मात्र, त्याच्या विचित्र वर्तनात कोणताही फरक पडला नाही, अशी माहिती त्याच्या आईने वृत्तवाहिन्यांना दिली.

मागील काही महिन्यांपासून माझ्या मुलाला व्हिडीओ गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. मोबाइल आणि संगणकावरही तो सातत्याने व्हिडीओ गेम खेळत असे. संपूर्ण रात्रभर व्हिडीओ गेम खेळून तो सकाळी झोपत असे, असेही या मुलाच्या आईने सांगितले आहे. प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्यामुळेच त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी थालासरी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे तो संगणकावर तासन्तास भयपट पाहात असे. त्यानंतर त्याने हातावर ब्लेडने जखम केली होती, असेही या नातेवाईकांनी म्हटले आहे.

राज्यात कोणी हा ऑनलाइन खेळ खेळत असल्यास त्याची माहिती नसल्याचे पोलीस अधिक्षक मनोज अब्राहम यांनी सांगितले. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. या तरुणाने ‘ब्लू व्हेल’ या खेळामुळे आत्महत्या केली की अन्य कोणते कारण आहे याचा तपास केला जाईल, असेही अब्राहम म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 2:00 am

Web Title: ravi shankar prasad on blue whale challenge
Next Stories
1 शीख विरोधी दंगलीच्या १९९ प्रकरणांची चौकशी बंद करण्याच्या निर्णयावर समिती स्थापन
2 तटरक्षक दलाचे सामर्थ्य वाढणार; ३२ हजार कोटींच्या योजनेला मंजुरी
3 केंद्राकडून बिहारसाठी लवकरच सव्वा लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता
Just Now!
X