23 November 2017

News Flash

शेवटची मैफील ‘ऑक्सिजन मास्क’च्या मदतीने

कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथील आपल्या शेवटची मैफील रंगविताना पं. रविशंकर यांना ‘ऑक्सिजन मास्क’चा आधार

पीटीआय, कोलकाता | Updated: December 12, 2012 7:45 AM

कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथील आपल्या शेवटची मैफील रंगविताना पं. रविशंकर यांना ‘ऑक्सिजन मास्क’चा आधार घ्यावा लागला होता.
गेल्या ४ नोव्हेंबरला पंडितजींनी निवडक श्रोत्यांसमोर कार्यक्रम केला होता. आपली मुलगी अनुष्का शंकरसह त्यांनी ही मैफील रंगविली होती. त्या वेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. किंबहुना आरोग्याच्या कारणास्तव ही मैफील यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अंतिमत: या बैठकीत त्यांनी ‘ऑक्सिजन मास्क’ लावून सतारवादन केले, अशी माहिती त्यांचे माजी सचिव आणि निकटवर्तीय राबिन पाल यांनी दिली. कोणीही केलेली कार्यक्रमाची विनंती रविशंकर नाकारत नसत, असे सांगत नवनवीन कलाकारांच्या मैफलींचे आयोजन करावे म्हणून ते आपल्याजवळ आग्रह धरीत असत. शिवाय त्या मैफलींना उपस्थितही राहात असत, असे पाल यांनी सांगितले.

वेरूळ लेण्यांच्या पाश्र्वभूमीवर सतार वाजविण्याची मजा काही औरच!
जगभरात भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचविणाऱ्या पं. रविशंकर यांना महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ लेण्यांनी मोहिनी घातली होती. जगभरात अनेक व्यासपीठांवर आपल्या सतारवादनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या या स्वरसम्राटाला वेरूळ लेण्यांच्या पाश्र्वभूमीवर सतार वाजविण्यास प्रचंड आवडत होते आणि याची कबुली दस्तुरखुद्द पं. रविशंकरांनीच दिली होती.
औरंगाबाद येथे होणाऱ्या वेरूळ संगीत महोत्सवामध्ये एकदा हे गुपित त्यांनी स्वत: उघड केले होते. ‘मला तुमचा हेवा वाटतो. एकाच वेळी तुम्हाला कैलास मंदिराचे सौंदर्य अनुभवताही येते आणि त्याच वेळी तुम्ही माझे सतारवादनही ऐकू शकता’, असे उद्गार ९०च्या दशकांत त्यांनी वेरूळ महोत्सवासाठी जमलेल्या श्रोतृवृंदासमोर काढले होते.

First Published on December 12, 2012 7:45 am

Web Title: ravi shankar wore oxygen mask for last performance