भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीवर एका पोलीस कॉन्स्टेबलने हल्ला केला. गुजरातच्या जामनगरमध्ये शारु सेक्सशन रोडवर सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. छोटयाशा अपघातानंतर संतप्त झालेल्या या पोलीस कॉन्स्टेबलने जडेजाची पत्नी रिवा सोळंकीला थेट मारहाण केली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शारु रोडवर रिवाच्या बीएमडब्ल्यू कारने कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडक दिली.

त्यानंतर संतप्त झालेला पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या मोटारसायलकवरुन उतरला व त्याने थेट जडेजाच्या पत्नीला मारहाण सुरु केली. संजय अहीर असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर रिवा गाडीतून उतरली. त्यावेळी संजयने मागचा पुढचा विचार न करता हात उचलला. या मारहाणीत रिवा जखमी झाली आहे असे पोलीस अधीक्षक प्रदीप सीजुल यांनी सांगितले.

या प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. महिलेला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. संजय अहिरची खातेनिहाय चौकशी होऊन त्याला निलंबित केले जाऊ शकते. अपघात घडला तेव्हा रिवा सोबत जडेजाची आई आणि मुलगी होती. रवींद्र जडेजा सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. आज अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चेन्नई आणि हैदराबादमध्ये प्लेऑफची महत्वाची लढत होणार आहे.