पाकमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय गुप्तचर संघटना रॉचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे विदेश सचिव अझिज अहमद चौधरी यांनी केला आहे.
 पाकिस्तानमधील होत असलेले आतंकवादी हल्ले रॉ घडवत आहे. हा मुद्दा वेळोवेळी भारतासमोर उपस्थित करण्यात आल्याचे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कराचीमध्ये नुकतीच दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांना रॉनेच
प्रशिक्षण दिल्याचे चौकशीत उघड झाले. भारत नेहमीच या गोष्टी नाकारत आल्याचा आरोप त्यांनी केला.
कराचीमध्ये बुधवारी बसवर झालेल्या हल्ल्यात रॉचा हात असल्याचे उघड झाल्यास हा विषय आंतरराष्ट्रीय संघटनांकडे नेण्याची धमकी त्यांनी दिली. या हल्ल्यात दहशतवादी संघटना आयएसआयएसची पत्रके जरी सापडली असली, तरी हल्ला त्यांनीच केल्याचे सिद्ध होत नसल्याचे ते म्हणाले.
मागील आठवडय़ातच पाक लष्करप्रमुखांनी रॉच दहशतवादी हल्ले घडवत असल्याचा आरोप केला होता. तसेच पाकच्या पंतप्रधानांनी अफगाणिस्तान भेटीवेळी काबूलमध्ये हा मुद्दा लावून धरला होता.
पाक बस हल्ल्यातील  मृतांवर अंत्यसंस्कार
पीटीआय, कराची- कराचीमध्ये शिया पंथीयांच्या बसवर झालेल्या हल्ल्यातील मृतांवर गुरुवारी कडेकोट सुरक्षेत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहरातील सखी हसन स्मशानभूमीत ४३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शेकडो नागरिकांसह राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. पाकिस्तानने मुस्लीम अल्पसंख्याक व इतरांमध्ये एकता राखण्यासाठी प्रार्थना व राष्ट्रीय ध्वज अध्र्यावर उतरवून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आयएसआयएसने केलेल्या या हल्ल्यात ४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यातील १६ जणांचा एका गोळीतच मृत्यू झाला, तर काहींच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून काही पुरावे हाती लागल्याचे सिंध प्रांताचे माहितीमंत्री शार्जिक मेमन यांनी सांगितले. हल्ल्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कराचीमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये त्यांनी शहरातील गुन्हे रोखण्यास पोलीस अपयशी ठरल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.