जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जबाबदारी घेऊनही पाकिस्तान मात्र उलट भारतावरच आरोप करत आहे. पाकिस्तान भारतीय हल्ल्याचं खापर भारतीय गुप्तचर यंत्रणेवर फोडत आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांनी हा हल्ला म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ने रचलेलं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी रॉ ने हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना रहमान मलिक यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणेला जबाबदार ठरवलं. पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांचं बरळणं एवढ्यावरच थांबलं नाही. भारत प्रत्येक हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवरच करत असतो असंही ते म्हणाले.

भारत नेहमीच पाकिस्तानविरोधात षडयंत्र रचत असतो असा आरोपच रहमान मलिक यांनी केला आहे. पाकिस्तानला गुन्हेगार ठरवता यावं यासाठी रॉने समझौता एक्स्प्रेसवरही हल्ला केला होता असंही बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मलिक यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. हेमंत करकरे यांना समझौता एक्स्प्रेस हल्ल्यात रॉ आणि आरएसएसचा हात असल्याची माहिती होती. यामुळेच रॉने त्यांना संपवलं असा दावा मलिक यांनी केला आहे.