01 December 2020

News Flash

Noteban: नोटाबंदी केलेल्या ९९. ३० टक्के नोटा आरबीआयकडे परत

RBI Annual Report 2017- 18: आरबीआयचा वार्षिक अहवाल २०१७- १८ बुधवारी प्रकाशित करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

RBI Annual Report 2017- 18: मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 99.30 टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या आहेत. आरबीआयच्या वार्षिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. नोटाबंदीमुळे चलनातून बाद झालेल्या नोटांपैकी 15.30 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या असून त्यांच्या तपासणी व नोंदणीचे काम अखेर संपल्याचे आरबीआयने अहवालात म्हटले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा 2017 – 18 चा वार्षिक अहवाल बुधवारी प्रकाशित करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे. देशात गुंतवणूक व उत्पादनाचे प्रमाण वाढले असून महागाई काही प्रमाणात कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अप्रत्यक्ष कर प्रणालीत जीएसटी मैलाचा दगड ठरल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

ऐतिहासिक अशा नोटबंदीनंतर आरबीआयकडे परत करण्यात आलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटांची तपासणी व नोंदणी करण्याचे काम संपल्याचे आरबीआयने जाहीर केले असून बाद केलेल्या एकूण नोटांपैकी 15.30 लाख कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. काळा पैसा संपुष्टात यावा, दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद व्हावी, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ व्हावी व रोखीचे प्रमाम कमी व्हावे अशा बहुउद्देशीय कारणासाठी नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीचे पाऊल उचलण्यात आले होते.

मार्च 2018 अखेरीस भारतीय बाजारपेठेमध्ये 18 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य 37.7 टक्क्यांनी वाढून 18.04 लाख कोटी रुपये झाल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. तर केवळ नोटांच्या संख्येचा विचार केला तर ही वाढ दोन टक्क्यांची आहे. जास्त किमतीच्या म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यामुळे प्रत्यक्ष नोटांच्या संख्येतील वाढ 2 टक्क्यांची आहे, परंतु मूल्यातील वाढ 37.7 टक्क्यांची झाल्याचे स्पष्ट होत आहे. एकूण चलनात असलेल्या नोटांच्या मूल्यामध्ये म्हणजे 18 लाख कोटी रुपयांमध्ये 500 व 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा तब्बल 72.7 टक्के इतका आहे. तर नव्याने दाखल करण्यात आलेल्या 200 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 2.1 टक्के आहे.

आरबीआयने या आर्थिक वर्षात म्हणजे 2018 – 19 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 7.4 टक्क्यांनी होईल असा अंदाज वर्तवला आहे. अर्थात, महागाईकडेही बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल असा इशारा आरबीआयनं दिला आहे. वर्षाच्या उर्वरीत महिन्यांमध्ये महागाईचा कल वाढण्याकडे असेल असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2018 12:03 pm

Web Title: rbi annual report 2017 18 99 30 percent of demonetised money returns
Next Stories
1 ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रात १२-१३ टक्के दराने वाढ शक्य!
2 तेजीची दौड कायम
3 संसदीय समितीचा रिझव्‍‌र्ह बँकेवर ठपका
Just Now!
X