एलओयू किंवा लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि एलओसी किंवा लेटर ऑफ कम्फर्ट यांचा व्यापारामध्ये आयातीसाठी होणारा वापर ताबडतोब बंद करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगऴवारी दिले आहेत. पंजाब नॅशनल बँकेमधला नीरव मोदी व मेहूल चोक्सींचा 13 हजार कोटी रुपयांचा घोटाऴा या एलओयू व एलओसीच्या माध्यमातून झाला होता. त्यामुळे सध्याच्या मार्गदर्शक प्रणालींचा अभ्यास करून भारतामध्ये मालाची आयात करण्यासाठी उद्योगधंदे वापरत असलेली ही सुविधा बंद करण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

लेटर ऑफ क्रेडिट व बँक गॅरंटी या दोन प्रकारांचा वापर मात्र मालाची आयात करण्यासाठी ठरवलेल्या निकषांच्या आत राहून करता येईल असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून नीरव मोदी व मेहूल चोक्सीनं पंजाब नॅशनल बँकेचे एलओयू वापरले व विदेशामध्ये अनेक बँकांकडून 13 हजार कोटी रुपये लुटले असा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस यायच्या आधीच कुटुंबियांसह नीरव मोदी फरार झाला असून तो कुठे आहे याचाही पत्ता लागलेला नाही. सीबीआय तसेच सक्तवसुली संचालनालय या प्रकरणाचा तपास करत असून पीएनबीच्या आजी माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.