एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली/मुंबई

प्रमुख व्याजदर स्थिर ठेवताना रिझव्‍‌र्ह बँकेने केवळ चार महिन्यांच्या फरकाने विकासदर अंदाजात १.९० टक्के कपात ही दशकातील सर्वात मोठी दर अंदाज कपात ठरली आहे. चालू वित्त वर्षांसाठीचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अंदाज ५ टक्के व्यक्त करण्यात आला असून, चार महिन्यांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने ६.९ टक्के विकासदराचे भाकीत केले होते.

चालू वित्त वर्षांतील आतापर्यंतच्या पाच द्विमासिक पतधोरणादरम्यान झालेली एकूण २.४० टक्के विकास दर अंदाज कपात ही २०१२-१३ मधील १.८० टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारच्या पतधोरणाद्वारे व्याजदर बदलेले नाहीत. यापूर्वी सलग पाच पतधोरण आढावा बैठकीत विकास दराला प्राधान्य देताना व्याजदर कपात केली गेली. मात्र, त्याचबरोबर विकास दराचे तिचे अंदाजही बदलत कमालीने खाली आले. यंदा तर वाढत्या महागाईची भीतीही रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली.

चालू आर्थिक वर्षांचे पाचवे द्विमासिक पतधोरण जाहीर करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २०१९-२० करिता विकास दर ५ टक्के असेल, असे म्हटले आहे. यापूर्वीच्या, ऑक्टोबरमधील बैठकीत तिचा अंदाज ६.१ टक्के होता. तर त्याआधीच्या, ऑगस्टमधील द्विमासिक पतधोरणात हा अंदाज ६.९ टक्के होता.

चालू वित्त वर्षांत, आतापर्यंत, पाच द्विमासिक पतधोरणादरम्यान २.४० टक्क्यांनी विकास दर अंदाज कमी करण्यात आला आहे. हे प्रमाण २००८-०९ मधील जागतिक आर्थिक मंदी तसेच ज्या तिमाहीत ४.३ टक्के विकास दर नोंदला गेल्या त्या, २०१२-१३ वित्त वर्षांतील प्रमाणापेक्षाही अधिक आहे. २०१२-१३ वित्त वर्षांच्या सुरुवातीला (एप्रिल २०१२) व्यक्त करण्यात आलेला विकास दराचा ७.३ टक्के अंदाज २०१२-१३ च्या अखेपर्यंत (जानेवारी २०१३) ५.५ टक्क्यांवर आणून ठेवला होता. १.८० टक्के विकास दर अंदाज कपातीच्या तुलनेत सध्याची २.४० टक्के कपात अधिक आहे.

वाढत्या महागाई अंदाजाने स्थिर दराबाबत प्रश्नचिन्ह

मोठय़ा प्रमाणात विकास दर अंदाज कमी केल्याने तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशक्तीपलीकडील महागाई दर अभिप्रेत करताना व्याजदर कपात आवश्यकच व मोठय़ा प्रमाणात अपेक्षित होती, असे अर्थ विश्लेषकांना वाटते. अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे ऑक्टोबरमधील किरकोळ महागाई निर्देशांक ४.६ टक्के तर नोव्हेंबरमध्ये तो ५.५ टक्के नोंदला गेला. डिसेंबरमध्येही तो ६ टक्के राहण्याची शक्यता आहे. चालू वित्त वर्षांच्या पहिल्या सहामाहीकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई दर ५.१ ते ४.७ टक्के असेल, असे म्हटले आहे. विकास दराचा अंदाज कमी तसेच महागाई वाढण्याची भीती व्यक्त करताना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने यंदाही दर कपात करणे गरजेचे होते, असा सूर व्यक्त होत असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या गुरुवारच्या स्थिर पतधोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.