रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे उत्तमप्रकारे काम करत आहेत, अशी कौतुकास्पद प्रतिक्रिया गुरूवारी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केली. जागतिक परिस्थितीचे भान ठेवत राजन यांनी ज्याप्रकारे देशातील महागाई नियंत्रणात ठेवली आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. याशिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात रेपो रेटमध्ये कपात न करण्याचा त्यांचा निर्णय चांगला असल्याचेही राठोड यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या गव्हर्नरपदाचा कालावधी न वाढवण्यासाठी पंतप्रधानांना पत्रे लिहली होती. राजन यांची धोरणे भारतीय अर्थव्यवस्थेला घातक आहेत आणि राजन यांची विचारसरणी अमेरिका धर्जिणी असल्याचे आरोप स्वामी यांनी या पत्रांमध्ये केले होते. या पार्श्वभूमीवर राज्यवर्धन राठोड यांचे वक्तव्य सरकारच्या राजन यांच्याविषयीच्या मानसिकतेत झालेला बदल आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाचा कालवाधी येत्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 3:00 pm