भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एकही नोट छापली नसल्याची माहिती आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला आरबीआयने दिलेल्या उत्तरातून याबाबतचा खुलासा झाला आहे.

आरबीआयने आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३,५४२.९९१ मिलियन नोटांची छपाई केली होती. तर, २०१७-१८ मध्ये छपाईत कपात झाली आणि १११. ५०७ मिलियन नोटा छापण्यात आल्या. यानंतर २०१८-१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईमध्ये अजून कपात करण्यात आली व केवळ ४६.६९० मिलियन नोटाच छापण्यात आल्या होत्या. तर सध्याच्या चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

यापूर्वीही दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाल्याचे वृत्त आले होते, पण सरकारने ते वृत्त फेटाळलं होतं. २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यामागे काय कारण आहे, किंवा केव्हापर्यंत छपाई बंद असेल याबाबत आरबीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बिझनेस स्टॅंडर्डने अधिकाऱ्यांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, दोन हजार रुपयांच्या उच्च नोटांची तस्करी करणे सुलभ आहे, त्यामुळे चलनात अधिक प्रमाणात २ हजार रुपयांच्या नोटा आल्यास ते सरकारच्या उद्दीष्टांसाठी धोकादायक आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर नव्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या. तसेच १०, २०, ५० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणल्या गेल्या. दरम्यान, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली. जाणकारांच्या मतांनुसार, जास्त मूल्याच्या या नोटेमुळं पुन्हा काळा पैसा वाढेल. याशिवाय २००० रुपयांच्या नोटेमुळं सुट्ट्या पैशांची समस्याही वाढेल, असंही त्यांनी सांगितलं होतं.