भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोन सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेचा समावेश आहे. बँकेनं KYCच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आल्यानंतर RBIने बँकेला दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, RBIने दोन बँकांवर कारवाई केली आहे. यात रायपूर येथील व्यावसायिक सहकारी बॅंक मर्यादीत आणि राज्यातील लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा समावेश आहे. RBIने व्यावसायिक सहकारी बँक मर्यादीत या सहकारी बँकेला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. तर महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेला दोन लाख दंड आकारला आहे.

बँकांवर कारवाई कशासाठी?

बँकांवरील कारवाईची रिझर्व्ह बँकेकडून याविषयी माहिती देण्यात आली आहे. रायपूरमधील व्यावसायिक सहकारी बँकेनं ऑन साईट एटीएम व केवायसी बद्दल असलेल्या RBIच्या नियमांचं पालन केलं नाही. तपासातून ही बाब समोर आली. तर लातूर येथील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेने KYC बद्दल RBIने दिलेल्या निर्देशाचं उल्लंघन केल्याचं समोर आलं. याप्रकरणी बँकेला दोन लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

ग्राहकांच्या व्यवहारावर परिणाम होणार?

दोन्ही बँकांवर करण्यात आलेली कारवाई उणीवा आढळून आल्यानं करण्यात आली आहे. याचा ग्राहकांच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं RBIने स्पष्ट केलं आहे. यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने राज्यातील एका बँकेवर मोठी कारवाई केली होती. कोल्हापूरमधील सुभद्रा बँकेचा परवाना आयबीआयने रद्द केला होता. बँकेच्या कामकाजावरून ही कारवाई करण्यात आली होती. ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता असल्यानं बँकेने ही कारवाई केली होती.