अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी पतधोरण आढाव्यात रेपो दराला कोणताही हात न लावता तो कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या ६.७ टक्के रेपो दर पुढील पतधोरण आढाव्यापर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर रोख राखीवता प्रमाणामध्येही (सीआरआर) बॅंकेने कोणताही बदल केलेला नसून, तो ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बॅंकेचा चालू आर्थिक वर्षातील सहावा द्विमासिक पतधोरण आढावा मंगळवारी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी जाहीर केला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर यंदा व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे पहिल्यापासून वर्तविण्यात येत होते. त्यातच मोदी सरकारचा २०१६-१७ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प चालू महिनाअखेरिस संसदेत सादर होणार असल्याने तूर्त व्याजदर कपात टाळली जाईल, असा अर्थतज्ज्ञ, कंपन्यांचा अंदाज होता. तो खरा ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे सध्याचे दर आणि सर्वसामान्य मान्सूनची शक्यता गृहीत धरून चलनवाढीचा दर ५ टक्क्यांचा आसपास राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने वर्तविला आहे. चालू आर्थिक वर्षातील विकास दर ७.४ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाच बॅंकेने वर्तविला आहे.