गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ५०० आणि २००० रूपयांची नोट जारी केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) २०० रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार रिझर्व्ह बँक या वर्षी जूननंतर या नोटा जारी करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने २०० रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

सरकारकडून एकदा अधिकृतरित्या मंजुरी मिळाल्यानंतर २०० रूपयांच्या नोटांची छपाई जूननंतर सुरू केली जाऊ शकते, असा दावा ‘लाइव्ह मिंट’ने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. काही इतर वेबसाइट्सनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात आरबीआयने देशातील ५ भागात १० रूपयांची प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू केली आहे. ही या चाचणी यशस्वी झाल्यानंतर इतर नोटाही प्लास्टिक चलनाच्या माध्यमातून सादर केल्या जाऊ शकतात.
जर २०० रूपयांच्या नोट जारी झाल्या तर काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आलेल्या २००० रूपयांच्या नोटांनंतरचे हे दुसरे नवे चलन असेल. काही दिवसांपूर्वीच माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार आरबीआयकडून पुन्हा एकदा नव्या वैशिष्ट्यांसह १००० रूपयांच्या नोटा जारी करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, आरबीआयने हे वृत्त फेटाळले होते.