रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून आणल्या जाणाऱ्या या नोटा महात्मा गांधी-२००५ च्या मालिकेतील नोटांसारख्याच असणार आहेत. ‘रिझर्व्ह बँक लवकरच १०० रुपये मूल्य असलेल्या नव्या नोटा बाजारात आणणार आहे. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इनसेट लेटर R लिहिलेले असेल. या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल’, असे रिझर्व्ह बँकेने काढलेल्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. या नोटांची छपाई २०१७ मध्ये करण्यात आली असल्याने त्या नोटांवर तसा उल्लेख असेल.

रिझर्व्ह बँकेकडून आणण्यात येणाऱ्या नव्या नोटा महात्मा गांधी-२००५ या मालिकेतील नोटांसारख्याच असणार आहेत. या नोटांवर असणाऱ्या नंबर पॅनलवरील अंक चढत्या क्रमाने असणार आहेत. १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यावर जुन्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत. त्यादेखील चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. १०० रुपयांच्या नव्या नोटांसोबतच रिझर्व्ह बँक २० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटादेखील चलनात आणणार आहे. मात्र नव्या नोटा चलनात आल्यावर २० आणि ५० रुपयांच्या नोटादेखील चलनात राहणार आहेत.