News Flash

आरबीआय विरुद्ध केंद्र सरकार! नेहरुंच १९५७ मधील पत्र ठरणार मोदी सरकारचं अस्त्र

उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर मोदी सरकार रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता संपुष्टात आणत असल्याची टीका काँग्रेसने केली होती.

संग्रहित छायाचित्र

स्वायत्ततेच्या प्रश्नावरून रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकारदरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, आता विरोधकांवर पलटवार करण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे १९५७ सालचे पत्र मोदी सरकारसाठी प्रमुख अस्त्र ठरणार, असे दिसते.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिेलेल्या वृत्तानुसार रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमधील संघर्ष हा नवा नाही. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि तत्कालीन आरबीआय गव्हर्नर सर बेनेगल रामा राव यांच्यातही मतभेद झाले होते. हे मतभेद इतके टोकाचे होते की नेहरुंच्या पत्रानंतर बेनेगल रामा राव यांनी थेट राजीनामाच दिला होता. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर मोदी सरकार रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता संपुष्टात आणत असल्याची टीका काँग्रेसने केली होती. आता नेहरुंचे हे पत्र समोर आल्याने काँग्रेसची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

काय म्हटलंय पत्रात?
राव हे रिझर्व्ह बँकेचे चौथे गव्हर्नर होते. साडे सात वर्ष ते या पदावर होते. मात्र, सरकारशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या वादाची सुरुवात राव आणि तत्कालीन अर्थमंत्री टी टी कृष्णमचारी यांच्यातील मतभेदाने झाली होती. टीटीके यांनी रिझर्व्ह बँक हा अर्थ खात्याचा एक भाग असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पात केला होता. त्याच वेळेला त्यांनी संसदेत अशीही शंका उपस्थित केली की स्वतंत्ररित्या विचार करण्याची आरबीआयची क्षमता असावी का?.

मात्र, राव यांचा यावर आक्षेप होता. त्यांनी  या वाक्यांचा संदर्भ देत टीटीके यांचे वर्तन उद्धट होते, अशी टीका केली होती. हे प्रकरण पंतप्रधान नेहरुंकडे गेले असता त्यांनी देखील अर्थमंत्र्यांची बाजू घेतली होती. नेहरुंनी राव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की आरबीआयने सरकारला मार्गदर्शन केले पाहिजे. मात्र, त्याच वेळी त्यांनी सरकारसोबत एकत्र पुढे जायला हवे. या पदावर काम करणे कठीण झाल्याचे वाटत असेल तर तुम्ही राजीनामाही देऊ शकता, असे या पत्रात म्हटले होते. यानंतर राव यांनी काही दिवसांमध्येच राजीनामा दिला होता.

स्वायत्ततेबाबत नेहरुंचे मत काय होते?
नेहरुंच्या मदते, रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र धोरणावर चालणे हे तर्कसंगत ठरणार नाही. रिझर्व्ह बँक स्वायत्त संस्था आहे. मात्र, त्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालनही केले पाहिजे, असे नेहरुंनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 11:06 am

Web Title: rbi vs modi government jawaharlal nehru 1957 letter to rbi governor may help government
Next Stories
1 १६ वर्षांनंतर पाकिस्तानी कैद्याची वाराणसीतील तुरुंगातून सुटका, आठवण म्हणून सोबत नेली भगवदगीता
2 ओदिशात चकमकीत पाच नक्षलींना कंठस्नान
3 VIDEO: पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा, स्वदेशीचा नारा
Just Now!
X