करोनाचा फेरसंसर्ग झाल्याची ३ संशयित प्रकरणे भारतात नोंदवण्यात आली असून, यापैकी दोन मुंबईतील, तर एक अहमदाबादमधील आहे, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे.

करोनाचा फेरसंसर्ग निश्चित करण्यासाठी आयसीएमआरने १०० दिवसांची मुदत ठरवली आहे आणि अँटीबॉडीजचे आयुष्य ४ महिन्यांचे असल्याचे काही अभ्यासांमध्ये आढळल्याचे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.

‘फेरसंसर्ग ही समस्या असून, हाँगकाँगमधील एका केसमध्ये ती पहिल्यांदा नोंदवण्यात आली. यानंतर मुंबईत ३ व अहमदाबादमध्ये १ अशी तीन प्रकरणे भारतात नोंदवण्यात आली’, असे भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘जागतिक आरोग्य संघटनेकडून आम्हाला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार जगात करोना फेरसंसर्गाची सुमारे १२ प्रकरणे आहेत. आता आम्ही आयसीएमआरच्या डेटाबेसची पाहणी करत असून, कुणाला पुन्हा संसर्ग झाला आहे हे शोधण्यासाठी त्यांच्याकडून माहिती मिळवण्याकरता त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आहोत’, असेही भार्गव म्हणाले.

फेरसंसर्ग ९० दिवसांनी असो, १०० किंवा ११० दिवसांनी, त्याची व्याख्या अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनेही निश्चित केलेली नसल्याचे भार्गव यांनी सांगितले.

रुग्णसंख्या ७२ लाखांवर

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ६३,५०९ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ७२,३९,३८९ वर पोहोचली. दिवसभरात ७३० रुग्णांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची एकूण संख्या १,१०,५८६ झाली आहे. एकूण करोनामुक्तांची संख्या ६३,०१,९२७ असून, हे प्रमाण ८७.०५ टक्के आहे.  ८,२६,८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सलग सहा दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संख्या नऊ लाखांहून कमी आहे.