संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे निधन झाले. बेंगळुरु या ठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली एनडीएसाठी हा मोठा धक्काच मानला जातो आहे. अशात विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी आणि भाजपा नेत्यांनीही अनंतकुमार यांचे निधन ही एक दुःखद घटना असल्याचं म्हटलं आहे.

अनंतकुमार यांच्यासारखा उमेदीने आणि मेहनतीने काम करणारा राजकारणी आपण हरवून बसलो आहोत. कर्नाटकच्या राजकारणात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. राजकारण आणि समाजकारण या दोन्हीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही अशा आशयाची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली आहे.

अनंतकुमार यांच्या जाण्याने एनडीएचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायमच आदर होता आणि त्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असे म्हणत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनंतकुमार यांना कर्करोगाने ग्रासले होते मात्र या रोगाशी ते लढा देतील आणि पुन्हा समर्थपणे उभे राहतील असे आम्हाला वाटत होते पण दुर्दैवाने तसे घडले नाही. त्यांचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते, कॅन्सरशी लढून ते पुन्हा उमेदीने काम करतील असे वाटले होते पण तसे घडले नाही. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे असे म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अनंतकुमार यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला आहे. अनंतकुमार यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. एक चांगला आणि कार्यकुशल नेता आपण हरवून बसलो आहोत असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.