बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय निती नसल्याप्रकरणीही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारबरोबरच उत्तर प्रदेशमध्येही निवडणूक घेण्याचे धाडस करावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, मी बिहारमध्ये उद्याच निवडणूक घेण्यास तयार आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये ही निवडणुका झाल्या पाहिजेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील भाजप आणि एनडीएच्या खासदार-आमदारांनी राजीनामा द्यावा. जर हिंमत असेल तर असं करा. मग मी बिहारमध्ये उद्याच निवडणुका घेईल, असे आव्हान त्यांनी दिले.

नितीश कुमार म्हणाले, २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थितीत करत अनेक आश्वासने दिली होती. तेव्हा मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही या आश्वासनांचा समावेश केला होता. पण आज शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीचा खर्चही मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांसमोरील संकटाबाबत राष्ट्रीय स्तरावर निती बनवली नसल्याने त्यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली. सर्वांत आधी पिकाला हमी भाव मिळायला हवा, असे ते म्हणाले. त्यांनी मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील घटना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करून तात्पुरता दिलासा देण्यापेक्षा देशातील कृषी संकट दूर करण्यासाठी ठोस उपाय योजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. पण आजही शेतकऱ्यांचे उत्पन्न हे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी आहे. मराठा, जाट, पाटीदार सारखे समाज एकेकाळी कृषी क्षेत्रात आघाडीवर होते. पण ते आज इतके मागास झाले आहेत की, त्यांनीही आरक्षण मागण्यास सुरूवात केली आहे. हे खरंच शेतकऱ्यांसमोरील मोठे संकट आहे, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.