वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अद्यापही अमान्य आहे. या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. निवडणुकीचा निकाल काहीही असला तरी चालेल मात्र तो अचूक असल्यासच आपण स्वीकारण्यास तयार आहोत, असे ट्रम्प यांनी आता स्पष्ट केले आहे.

डमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांचा ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत पराभव केला. तथापि, ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नसून निकालास कायदेशीर आव्हान दिले आहे.

निवडणुकीत पराभव झाला तरी त्याचे वाईट वाटणार नाही, मात्र जो निर्णय होईल तो निष्पक्षपाती हवा आणि म्हणूनच आम्ही लढा देत आहोत कारण आमच्यासमोर अन्य पर्यायच नाही, असे ट्रम्प यांनी बुधवारी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात स्पष्ट केले. हा कार्यक्रम केवळ ट्रम्प समर्थकांसाठीच आयोजित करण्यात आला होता, माध्यमांसाठीही तो खुला नव्हता, त्याचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल करण्यात आला.

आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते सुस्पष्ट आहेत, माध्यमे आणि काही न्यायाधीशांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आहे, पुरावे खरे असल्याची त्यांनाही जाणीव आहे, निवडणुकीत कोण विजयी झाले आहे तेही त्यांना माहिती आहे, परंतु तुम्ही बरोबर आहात हे सांगण्यास ते नकार देत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.