तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मनी लाँड्रिग प्रकरणी चौकशीसाठी दिल्लीत हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. दरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर लोकांसमोर फाशीची शिक्षा दिली जावी असं म्हटलं आहे. अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत.

अभिषेक बॅनर्जी लोकसभेतील डायमंड हार्बर जागेचे प्रतिनिधित्व करतात आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. ईडीने अभिषेक बॅनर्जी यांनी राज्यातील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित वसुली प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं आहे. उद्या दिल्लीत याप्रकरणी चौकशी होणार आहे.

याआधी १ सप्टेंबरला ईडीने रुजिरा बॅनर्जी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मात्र दोन लहान मुलं असल्याने उपस्थित राहण्यास नकार देत त्यांनी कोलकातामधील आपल्या घरी चौकशी करावी अशी विनंती केली होती.

दरम्यान दिल्लीला जाताना अभिषेक बॅनर्जी यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “नोव्हेंबरमध्ये जाहीर सभेत जे मी बोललो होतो त्याचा पुनरुच्चार करत आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात माझा १० पैशांचाही संबंध असल्याचं सिद्ध करु शकले तर ईडी किंवा सीबीआय चौकशीची गरज नाही. मी स्वत: सर्वांसमोर फाशी घेईन”.

“मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. पण ते गोष्टी सार्वजनिक का करत नाही आहेत? कोलकातामधील प्रकरणासाठी मला दिल्लीत हजर राहण्याचं समन्स दिलं आहे,” असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा उल्लेख न करता भाजपा नेत्याचं नाव नारदा लाच प्रकरणी दाखल चार्जशीटमध्ये का नाही? अशी विचारणा त्यांनी केली.