कठुआ बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा ही मागणी जोर धरत असताना केंद्र सरकारने जम्मू काश्मीर सरकारने तयारी दाखवल्यास हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आमची काहीच हरकत नसल्याचं म्हटलं आहे. ‘जिथपर्यंत आमचा प्रश्न आहे, सीबीआयकडे तपास सोपवण्यास आमचा काही विरोध किंवा समस्या नाहीये. जर राज्य सरकारने आम्हाला सांगितलं तर आम्ही लगेच त्याक्षणी प्रकरण सीबीआयकडे सोपवू’, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहने सांगितलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी न्यायालय हा एक मार्ग असून तेथूनही प्रकरण सीबीआयकडे सोपवता येऊ शकतं असं सांगितलं. ‘माझ्या माहितीप्रमाणे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका प्रलंबित आहे’, असं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवावा का अशी विचारणा जम्मू काश्मीर सरकारकडे केली असतानाच जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य आलं आहे.

१० जानेवारी रोजी एका आठ वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं होतं. १७ जानेवारीला कठुआ जिल्ह्यात तिचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान, पोलिसांनी तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करुन नंतर हत्या करण्यात आली असल्याचं सांगितलं. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन तरुणाचाही समावेश आहे. सोमवारी न्यायालयात त्यांची ट्रायल सुरु झाली असून आपण निर्दोष असून, नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.

अनेकजण याप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करत होते. यामध्ये आरोपींच्या नातेवाईकांचाही समावेश होता. भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेत ही मागणी केली होती, पण ती फेटाळण्यात आली होती. भाजपाच हेच दोन मंत्री आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झाले होते, ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. सोमवारी राज्यपालांनी हे राजीनामे स्विकारले.