समाजातील सर्वच घटकांसाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विधायक काम केले तर तृणमूल काँग्रेस संपूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहे, असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला लगावला.
धर्माच्या आधारावर जनतेचे विभाजन आम्ही होऊ देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी येथील सभेत भाजपला फटकारले. सरकार चालवणे व राजकारण यामध्ये फरक आहे. त्यामध्ये सरमिसळ करता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेसने विविध धर्मिक नेत्यांची सभा आयोजित केली होती. मी जरी चूक केली तरी मला सोडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र अफवा पसरवणे, दिशाभूल करणारा प्रचार करणे, जातीय दंगलींचा प्रयत्न हे करणे म्हणजे धर्म नव्हे. फुटीचे राजकारण आम्ही कधीही मान्य करणार नाही. देश विकण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप ममतांनी केला. नव्या सरकारने रेल्वे व संरक्षणामध्ये थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली. डिझेलचे भाव नियंत्रणमुक्त केले अशा घटना याची साक्ष आहेत अशी टीका ममतांनी केली.  जाहीरनाम्यात ज्या बाबींचे आश्वासन आम्ही दिले त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे. जनतेसाठी आम्ही काम करू असे त्यांनी गृहीत धरू नये, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.