रेरा अंतर्गत सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा सल्ला राज्य सरकारांना आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात येईल असे केंद्र सरकारकडून बुधवारी सांगण्यात आले. सध्याच्या परिस्थिती रिअल इस्टेट सेक्टरसाठी हा मोठा दिलासा आहे.

रेरातंर्गत सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांची नोंदणी आणि काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे निर्मला सीतारमन आज पत्रकार परिषदेत म्हणाल्या. “करोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे बांधकाम व्यावसायिकांकडून रेराची मुदत चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुदत वाढवण्याची गरज आहे” असे त्या म्हणाल्या.

नोंदणीकृत प्रकल्पांची बांधकाम पूर्ण करण्याची मुदत २५ मार्च किंवा त्यानंतर संपत असेल तर सहा महिने मुदतवाढ देण्याचा राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सल्ला देण्यात येईल. यामुळे बांधकाम विकासकांवरील ताण कमी होईल व त्यांना प्रकल्प पूर्ण करता येईल असे सीतारमन म्हणाल्या.