तमिळनाडूतील मामल्लापुरमला आणि महाबलीपूरम या दोन शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान दोन दिवसांच्या अनौपचारिक परिषद शुक्रवारी आणि शनिवारी पार पडली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाबलीपूरम येथील समुद्रकिनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यांवार फेरफटका मारत किनाऱ्याची साफसफाई केली. या साफसफाईची खूपच चर्चा झाली. मात्र एकीकडे ही चर्चा होत असताना दुसरीकडे मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी मामल्लापुरमला स्वच्छ ठेवण्यासाठी महिन्याभरापासून झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा पगारच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीआधी मामल्लापुरमचे सर्व रस्ते स्वच्छ करण्यासाठी सफाई कर्माचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. या भेटीच्या काही दिवस आधीपासूनच शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा अजिबात दिसत नव्हता. मात्र इतकं सगळं करुनही राज्य सरकारच्या अख्त्यारित काम करणाऱ्या कर्चमाऱ्यांना मागील महिन्याभरापासून पगार मिळालेला नाही. तसेच साफसफाईच्या कमासाठी नेमणूक करण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. या कर्मचाऱ्यांना हा पगार कधी मिळणार हेही या कर्मचाऱ्यांना ठाऊक नसल्याचं त्यांच म्हणणं आहे. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या जी शिवथरी यांना दिवसाचे १०० रुपये पगार मिळतो. मात्र तो पगारही त्यांना मिळालेल नाही. ‘काही दिवसापूर्वी पंचायतीने कामासाठी लोकं हवी आहेत असं सांगितलं. त्यावेळी आम्ही काही गावकरी काम करण्यास तयार झालो. मात्र आम्हाला अद्याप त्याचे पैसे मिळालेली नाहीत,’ असं शिवथरी सांगतात.

शिनपिंग शहरामध्ये येण्याआधी त्यांच्या ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता तो सर्व मार्ग पुन्हा झाडून स्वच्छ करण्यात आला. यासाठी दारोदारी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कामाला लावले होते. या कामाचे त्यांना कोणतेच मानधन देण्यात आलेले नाही. ‘मी या भेटीसाठी शहरात करण्यात येणाऱ्या सुशोभिकरणाच्या कामासाठी दहा दिवसांहून अधिक काळ काम केले आहे. रोज दारोदारी जाऊन कचरा गोळा करण्याबरोबरच हे अतिरिक्त काम आम्हाला दिले होते. रोज मध्यरात्री हे काम संपायचे. तरी आता या भेटीनंतर आम्हाला आमची मजुरी देण्यात आली नाही,’ असं एस. रमेश या सफाई कर्मचाऱ्याने ‘न्यू इंडियन इक्सप्रेस’शी बोलताना सांगितले.