बिहार राज्य सरकारने कंत्राटी तत्त्वावर सप्टेंबरमध्ये ४३ हजार ४७७ शिक्षकांची भरती केली. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शिकविण्यासाठी भरती करण्यात आलेल्या शिक्षकांची पात्रता चाचणी घेण्यात आली. ही पात्रता चाचणी इयत्ता तिसरी ते पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित तयार करण्यात आली होती. परंतु तरीसुद्धा परीक्षा देणाऱ्या एकूण शिक्षकांपैकी तब्बल २४ टक्के म्हणजे १० हजार ६१४ शिक्षक या चाचणीत चक्क अनुत्तीर्ण ठरले.
२००७ साली बिहार राज्य सरकारने विविध शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची अडीच लाख पदे भरण्याचे ठरविले. या सर्व शिक्षकांची नेमणूक कंत्राटी तत्त्वावर करण्याचे ठरले. नोकरीत रुजू झाल्यानंतर या शिक्षकांच्या दोनदा पात्रता चाचण्या घेण्यात आल्या. एकदा अपात्र ठरल्यानंतरही दुसऱ्यांदा या शिक्षकांना संधी देण्यात आली. विशेष म्हणजे या चाचणीत इंग्रजी, गणित, विज्ञान, हिंदी आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. त्याचबरोबर कोणत्याही स्वरूपाचे नकारात्मक गुण दिले जाणार नव्हते. खुल्या गटातील शिक्षकांना उत्तीर्णतेसाठी ४५ टक्के गुण, तर अन्य गटांतील शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी ४० टक्के गुण अनिवार्य करण्यात आले. दोनदा बसूनही या चाचणीत शिक्षक नापास झाले तर त्यांना नोकरी गमवावी लागेल असे निकष ठरविण्यात आले. माध्यमिक स्तरातील शिक्षक किमान पदवीधर असणे, प्राथमिक स्तरावरचे शिक्षक किमान बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य होते. तरीसुद्धा २४ टक्के शिक्षक अनुत्तीर्ण झाल्याचा धक्कादायक निकाल लागला.
याबाबत राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण मंडळाचे संचालक हसन वारिस म्हणाले की, २००९ सालापासून राज्यात अशा प्रकारे शिक्षकांची पात्रता चाचणी घेतली जात असून इयत्ता तिसरी, चौथी, पाचवी आणि काही प्रश्न इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित विचारले जातात. त्याचबरोबर या चाचणीतील प्रश्नपत्रिकांची जाहिरातही केली जाते. मात्र असे असूनही २४ टक्के शिक्षक अपात्र ठरले, अशी माहिती वारिस यांनी दिली.
शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणूनच अशा प्रकारची शिक्षकांची पात्रता चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आल्याचे मनुष्यबळ विकास खात्याचे प्रधान सचिव अमरजीत सिन्हा यांनी सांगितले.
२०१० साली या पात्रता चाचणीतून उत्तीर्ण झालेल्या एका शिक्षकाने सांगितले की, सूर्याच्या सर्वाधिक जवळ कोणता ग्रह आहे, यासारखे अतिशय सोपे आणि सर्वसामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न या चाचणीत असतात. तरीसुद्धा २०१० साली परीक्षा देणाऱ्या शिक्षकांपैकी आठ टक्के शिक्षक अनुत्तीर्ण झाल्याचेही या शिक्षकाने सांगितले.