‘क्रेडाई’ (द कॉनफिड्रेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना टू बीएचके घरे देणार असल्याची घोषणा केली. संघटनेच्या अधिकाऱ्यांनी एक पत्रक जारी केले आहे.

‘क्रेडाई’चे अध्यक्ष असणाऱ्या जेक्सी शाह यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. ‘आम्ही शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांच्या दुख:द काळात त्यांच्या सोबत आहोत. आमच्या संघटनेने या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक जवनाच्या कुटुंबाला त्यांच्या राज्यामधील त्यांच्या राहत्या शहरामध्ये टू बीएचके फ्लॅट देण्याचा निर्णय घेतला आहे’, असं शाह यांनी सांगितले. शहीद जवानांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगामधून सावरण्याची ताकद मिळो हीच ‘क्रेडाई’चे सदस्य असणाऱ्या १२ हजार ५०० सदस्यांची प्रार्थना आहे असंही शाह यांनी सांगितले.

‘क्रेडाई’ ही देशभरातील बांधकाम व्यावसायिंकाच्या सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक आहे. देशातील २३ राज्यांमधील २०३ लहान मोठ्या शहरांमध्ये ‘क्रेडाई’चे सदस्य असणाऱ्या बांधकाम व्यवसायिंकांचे गृहनिर्माण प्रकल्प आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने १०० किलोची स्फोटके असलेले वाहन सीआरपीएफच्या वाहनाला जाऊन धडकवले होते. यामुळे झालेल्या स्फोटात जवान शहीद झाले होते.

सीआरपीएफचे २५०० हजार हून अधिक जवान ७८ वाहनांमधून प्रवास करत होते. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास श्रीनगर-जम्मू महामार्गावर दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरात परिसरात हल्ला करण्यात आला होता.