18 January 2018

News Flash

‘बहेन’जींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भावाच्या उद्योगात ‘बूम’

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तिसऱया टर्ममध्ये (2007-12) त्यांचा लहान भाऊ आनंद कुमार यांच्या बांधकाम उद्योगामध्ये एकदम बूम आल्याचे आकड्यांवरून दिसते.

नवी दिल्ली | Updated: January 31, 2013 11:04 AM

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तिसऱया टर्ममध्ये (2007-12) त्यांचा लहान भाऊ आनंद कुमार यांच्या बांधकाम उद्योगामध्ये एकदम बूम आल्याचे आकड्यांवरून दिसते. इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या पाहणीमध्ये कुमार यांच्या कंपनीचे नोएडा आणि ग्रेटर नोएडा मधील बिल्डर, जेपी, युनिटेक आणि डीएलएफ या बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपन्या यांच्याशी व्यावसायिक लागेबांधे असल्याचे दिसून आले. मायावतींचा उजवा हात समजले जाणारे पक्षाचे राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांच्या मुलाबरोबरही आनंदकुमार यांच्या व्यावसायिक वाटाघाटी झाल्याचे स्पष्ट दिसते. या सर्व कंपन्यांचे उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत, हे विशेष.
वरील सर्व बांधकाम व्यावसायिकांशी आनंद कुमार यांच्या कंपनीचे असलेले संबंध कायदेशीर असल्याचे त्यांच्या कंपनीच्या वतीने इंडियन एक्स्प्रेसला सांगण्यात आले. राज्य सरकारचा किंवा तत्कालिन मायावती सरकारचा या सर्वांशी काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. खुद्द मायावती यांनीही त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. माझ्या सरकारने कोणतेही गैरकाम केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
द हॉटेल लायब्ररी क्लब प्रायव्हेट लिमिटेड हा आनंद कुमार यांनी सुरू केलेला पहिला व्यवसाय. मसुरीमधील हॉटेल शिल्टन हे या कंपनीच्या मालकीचे. मार्च २०१२ला या कंपनीची २८७ कोटी रुपयांची संपत्ती होती. त्याच वित्तीय वर्षात आनंदकुमार यांच्या ५० कंपन्यांचे एकत्रितपणे ७५० कोटी रुपयांचे भांडवल होते.
२००७-०८ मध्ये आनंदकुमार यांच्याशी संबंधित कंपन्यांनी कार्नोस्टी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर व्यावसायिक करार केला. २०१२मध्ये डीएलएफने या कंपनीमध्ये सहा कोटी रुपये गुंतविले, तर २०१२मध्ये युनिटेकने ३३५ कोटी रुपये. या दोन्ही कंपन्यांनी ही सर्वसाधारण स्वरुपाची गुंतवणूक असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही कंपन्या तसेच जेपी यांचे कार्नोस्टीबरोबर उत्तर प्रदेशात निवासी आणि व्यावसायिक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत.

First Published on January 31, 2013 11:04 am

Web Title: realty giants in web of firms linked to mayawatis brother
  1. No Comments.