पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पेहरावाविषयी अतिशय जागरुक असतात. कोणत्या ठिकाणी जाताना नेमके कोणते कपडे परिधान करायचे, याचा जाणीवपूर्वक विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कायम केला जातो. इस्रायलमध्येदेखील मोदी यांच्या पेहराव निवडीचा अनुभव उपस्थितांना आला.

पंतप्रधान मोदी मंगळवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा बंदगळ्याचा कोट परिधान केला होता. यावेळी त्यांच्या खिशात निळ्या रंगाचा रुमाल होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक पांढऱ्या आणि निळ्या रंगांची निवड केली होती. इस्रायलच्या झेंड्यात पांढरा आणि निळा रंग असल्याने मोदींनी या दोन रंगांची पेहरावासाठी निवड केली होती. भारत इस्रायलसोबत आहे, हा संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पांढऱ्या आण निळ्या रंगांची पेहरावासाठी निवड केली होती.

पंतप्रधान मोदी याद वाशेम होलोकास्ट स्मारकाला भेट देणार होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्या अनुषंगाने कपड्यांची निवड केली होती. याद वाशेम स्मारकाला भेट देणारे लोक स्मारकाच्या सन्मानार्थ डोके झाकतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी त्यांच्यासोबत टोपी घेऊन गेले होते. यातही मोदींनी भारतीय संस्कृतीची झलक दाखवली. पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधील लोकांकडून परिधान करण्यात येत असलेली टोपी भारतात नेली होती. याद वाशेम स्मारकाला भेट देताना पंतप्रधान मोदींनी हिमाचली टोपी परिधान केली होती.

‘याद वाशेम स्मारकाला भेट देणे ही माझ्यासाठी मन हेलावून टाकणारी गोष्ट होती. ज्यू जनतेवर झालेल्या अनन्वित आणि अमानुष अत्याचारांचे तसेच त्या अत्याचारांना पुरुन उरत स्वत:ची प्रगती साधणाऱ्या जनतेचे हे स्मारका म्हणजे एक प्रतिक आहे,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी स्मारकाजवळील अभिप्राय पुस्तिकेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘याद वाशेम स्मारक हा जगासाठी आरसा आहे,’ असेदेखील मोदींनी अभिप्राय पुस्तिकेत नमूद केले.