दिल्लीत आम आदमी पार्टीचे (आप) सरकार स्थापन झाल्यापासूनच त्या पक्षामागे शुक्लकाष्ठ लागले असतानाच बुधवारी सत्तारूढ पक्षाच्या एका आमदारानेच सरकारला घरचा अहेर दिला. निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांपासून सरकार दूर जात असल्याची टीका आपचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी केली आहे.
दिल्लीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने उद्विग्न झालेल्या बिन्नी यांनी त्यावेळीच आपली जाहीर नाराजी प्रकट केली होती. निवडणुकीच्या प्रचारात आपने दिलेली आश्वासने आणि आता करीत असलेली कृती यामध्ये खूप तफावत आहे, असे बिन्नी यांनी म्हटले आहे. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत आपण पक्षाच्या पारदर्शकतेबाबत सविस्तर स्पष्टीकरण देणार असल्याचेही बिन्नी म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आपच्या सर्व ७० उमेदवारांची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत बिन्नी यांनी एकही मुद्दा उपस्थित केला नाही. त्यांचा हेतू काय आहे याची आपल्याला कल्पना नाही आणि आपण त्यामध्ये पडूही इच्छित नाही, असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, आपल्याला मंत्रिपद देण्यात आले नाही म्हणून आपण नाराज नाही तर जनतेला दिलेल्या आश्वासनांपासून पक्ष दूर जात असल्याची खंत सलत आहे, असे बिन्नी म्हणाले.
बिन्नी यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल य्म्हणाले की, बिन्नी यांनी प्रथम मंत्रिपदाची मागणी केली होती आणि आता त्यांना लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यांच्या वक्तव्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही.सर्वप्रथम मंत्रिपदाची मागणी करणाऱ्या बिन्नी यांनी आपल्या निवासस्थानी येऊन लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची मागणी केली. मात्र जे आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्यांना लोकसभेची उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे