जगण्याची लढाई

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी बंदचे निर्बंध लागू झाले असताना हैदराबादमधील मॉल, मल्टिप्लेक्स आणि पब्जच्या मालकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्याची ग्वाही दिली आहे. मॉलमधील किराणा कक्ष सध्या सुरू आहेत. करोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीने गॅलेरिया मॉलला १९ मार्च रोजी भेट दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा मॉल आरोग्य विभागाने बंद केला आहे. हैदराबादमधील बडय़ा ५० मॉलपैकी सध्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सुरू आहेत. सध्या निर्बंधांमुळे मॉल, मल्टिप्लेक्स आणि पब्ज बंद असले तरी तेथे काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या सध्या तरी कायम आहेत. सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्यास सांगितले असले तरी त्यांचा मार्च महिन्याच पगार दिला जाईल, असे मालकवर्गाने स्पष्ट केले आहे. सुजाना मॉलमधील अधिकारी रवीकुमार यांनी सांगितले की, कमीत कमी पुढील महिन्यापर्यंत तरी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कायम आहेत. ३१ मार्चनंतरही आम्हाला बंद ठेवण्यास सांगितल्यास आम्ही अडचणीत येऊ. आमची कमाई झाली नाही, तर त्यापुढे वेतन देणे कठीण होईल.