बिहार जद(यू) विधिमंडळ पक्षाचे नेते विजयकुमार चौधरी यांनी आपल्या पक्षाला विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्याची आणि त्यानुसार सभागृहात आसनांची व्यवस्था करण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांना केली आहे.
जद(यू)ने मुख्यमंत्री जितन राम मांझी यांची पक्षातून हकालपट्टी केली. कोणत्याही पक्षाशी संलग्न नसतानाही ते मुख्यमंत्री म्हणून काम करीत आहेत, असे चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
सभागृहात मांझी सरकारला विरोध करण्याचा निर्णय जद(यू) पक्षाने घेतला असून विरोधी पक्ष म्हणून बसण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला मुख्य विरोधी पक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि त्यानुसार पक्षाच्या सदस्यांसाठी सभागृहात आसनांची व्यवस्था करावी, असे चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना सांगितले आहे. आपल्या पक्षाकडे संख्याबळ जास्त आहे, असे चौधरी म्हणाले असले तरी त्यांनी किती आमदार आपल्याबरोबर आहेत ते सांगण्यास नकार दिला.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्यात गेल्या आठवडय़ात झालेल्या गोपनीय बैठकीवर जद(यू)ने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नीती आयोगाच्या बैठकीनंतर मोदी आणि मांझी यांची भेट झाली त्याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक अथवा भेटीचे छायाचित्र का प्रसिद्ध करण्यात आले नाही, असा सवाल जद(यू) विधिमंडळ पक्षाचे नेते चौधरी यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर अधिकृत प्रसिद्धीपत्रक आणि छायाचित्र जारी केले जाते ही प्रथा आहे.