येथील बायोफोर इंडिया फार्मास्युटिकल्स कंपनीला भारतीय औषध महानियंत्रकांनी फॅविपिरावीर या औषधाचे उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे.

कोविड १९ ची कमी ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा वापर केला जातो. या कंपनीला औषधाचे घटक तयार करून ते निर्यात करायलाही परवानगी देण्यात आली आहे. तुर्कस्थानात औषध घटक पाठवण्याची व्यवस्था ही कंपनी करणार आहे. भारत, बांगलादेश व इजिप्तमधील कंपन्यांशी भागीदारी करून फॅविपीरावीरचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी ही कंपनी प्रयत्नशील आहे.

कोविड १९ साथीमुळे औषध कंपन्यांनी विविध औषधांच्या निर्मितीवर भर दिला आहे. बायोफोर कंपनीचे संस्थापक व मुख्य वैज्ञानिक अधिकारी माणिक रेड्डी पुलागुरला यांनी सांगितले की, आमचे उत्पादन प्रकल्प हे अमेरिका व युरोपीय समुदायाच्या निकषांचे पालन करणारे आहेत. भारतातील फॅविपिरावीरची गरज पूर्ण करण्याचा आमचा हेतू आहे. हे औषध विषाणूविरोधी असून ते इन्फ्लुएंझावरही गुणकारी आहे.

भारत व तुर्कस्थानशिवाय रशिया व मध्यपूर्वेतही या औषधाला मान्यता देण्यात आली आहे.