उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचाच  भाग म्हणून गुरुवारी लखनौ शहराजवळ ३५०० हून अधिक जोडप्यांचा सामुदायिक विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली व नवविवाहित दाम्पत्यांना आशीर्वाद दिला. उत्तर प्रदेशचे कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी हा जागतिक विक्रम असल्याचे म्हटले आहे.

रंगीबेरंगी पेहरावात अनेक जोडपी मोठ्या मैदानावर अंथरलेल्या गालिच्यावर बसून पुरोहित येण्याची प्रतीक्षा करताना दिसत होती. या वेळी काही मुस्लीम जोडप्यांचाही विवाह करण्यात आला. वेदमंत्रांच्या पठणासोबतच ‘कबूल है’ हा निकाह निर्धारही करण्यात आला.