सलग सातव्या महिन्यात एक लाख कोटींचा टप्पा पार

देशात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या करोनाच्या भयावह स्थितीमुळे विविध राज्यांत टाळेबंदी आणि कठोर निर्बंध लागले. त्यामुळे रोजगार आणि उद्योग धंद्यांवर विपरित परिणाम झाला असला, तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) वसुलीने विक्रमी नोंद केली. एप्रिल महिन्यात १.४१ लाख कोटींची विक्रमी वसुली झाली, असे शनिवारी अर्थमंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

एप्रिल महिन्यातील जीएसटी वसुली मार्च महिन्यातील १.२३ लाख कोटींपेक्षा १४ टक्के अधिक आहे. एप्रिल महिन्यात एक लाख ४१ हजार ३८४ लाख कोटींचा जीएसटी प्राप्त झाला.  त्यामध्ये केंद्राचा २७ हजार ८३७ कोटी, राज्याचा ३५ हजार ६२१ कोटी, एकीकृत जीएसटी ६८ हजार ४८१ कोटी, उपकर ९४४५ कोटींचा समावेश आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ  लागले होते. त्यामुळे जीएसटीच्या वसुलीत वाढ झाली होती. मात्र एप्रिलपासून पुन्हा एकदा करोनाची दुसरी लाट आल्याने स्थिती गंभीर बनली. त्यातही ही विक्रमी वसुली झाली.

वसुलीचा आलेख…  वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीने सलग सातव्या महिन्यात एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये १.०५ लाख कोटी, नोव्हेंबर महिन्यात १.०४ लाख कोटी, डिसेंबर महिन्यात १.१५ लाख कोटी जीएसटी वसुली झाली. तर यावर्षी जानेवारी  महिन्यात १.१९ लाख कोटी, फेब्रुवारीत १.१३ लाख कोटी, तर मार्चमध्ये १.२३ लाख कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.