News Flash

भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम

सर्वाधिक अंतर विना थांबा पार

भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम
(संग्रहित छायाचित्र)

सर्व महिला वैमानिकांनी सारथ्य केलेले एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्को- बंगळूरु हे विमान सोमवारी बंगळूरुला येऊन पोहचले आणि भारतीय विमानाने विना थांबा सर्वाधिक अंतर पार करण्याच्या या विक्रमाची देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासात नोंद झाली.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून निघालेले एआय-१७६ हे विमान सोमवारी पहाटे ३.४५ वाजता बंगळूरुच्या केंपेगौडा विमानतळावर उतरल्यानंतर त्यातील कर्मचारी विमानतळाच्या लाऊंजकडे आले, तेव्हा मोठय़ा संख्येत जमलेल्या लोकांनी आनंदाने घोषणा देत त्यांचे स्वागत केले. सर्व महिला वैमानिकांचा समावेश असलेल्या या चमूने उत्तर ध्रुवावरून सर्वाधिक अंतराचे उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.

एअर इंडिया किंवा इतर कुठल्या भारतीय विमान कंपनीतर्फे संचालित हे सर्वात लांब अंतराचे व्यावसायिक विमान उड्डाण असेल, असे एअर इंडियाने यापूर्वी सांगितले होते. जगाच्या दोन विरुद्ध टोकांवर असलेल्या या दोन शहरांतील थेट अंतर १३,९९३ किलोमीटर असून, त्यात सुमारे १३.५ तासांचा ‘टाइम झोन’ बदल होतो.

लोकांने हर्षोल्लास व्यक्त करत टाळ्या वाजवत असताना कॅप्टन झोया अगरवाल, कॅ. पापागरी तन्मयी, कॅ. आकांक्षा सोनावणे व कॅ. शिवानी मन्हास यांनी हाताचे अंगठे उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.  ‘भारतीय हवाई वाहतुकीतील महिला वैमानिकांनी इतिहास निर्माण केला असून हा मनात जतन करण्याचा आणि साजरा करण्याचा क्षण आहे. या चारही वैमानिकांचे हार्दिक अभिनंदन!’, असे ट्वीट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 12:36 am

Web Title: record of female pilots covering the longest distance abn 97
Next Stories
1 मराठा आरक्षणानिमित्ताने न्यायालयीन लढा देशव्यापी
2 राजकारण प्रवेशाचा आग्रह करून आणखी क्लेश देऊ नका – रजनीकांत
3 संरक्षण प्रणाली निकामी झाल्याने पाकिस्तानातील वीज गायब
Just Now!
X